आता रेल्वेत मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत; आगीच्या घटना थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

रेल्वेच्या या निर्णयाची माहिती मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आधी पश्चिम विभागाच्या रेल्वेने १६ मार्चपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रेल्वेत चार्जिंग पोर्टसाठीची वीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

    नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना थांबवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान तुम्हाला रेल्वेतील मोबाईल चार्जिंग पोर्टचा वापर करता येणार नाही. त्याला जोडणारी वीज या वेळेत बंद करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाची माहिती मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आधी पश्चिम विभागाच्या रेल्वेने १६ मार्चपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रेल्वेत चार्जिंग पोर्टसाठीची वीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

    पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी पीटीआयला सांगितलं की, रेल्वे बोर्डने अशा प्रकारचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. पश्चिम विभागाने याची अंमलबजावणी १६ मार्चपासून सुरू केली आहे. रेल्वेमध्ये लागणाऱ्या आगी थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डने काही महत्वाचे निर्णय या आधीच घेतले आहेत. दक्षिण विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी गुगनेसन यांनी पीटीआयला सांगितलं की, रेल्वे बोर्डने घेतलेला हा निर्णय काही नवीन नाही. या आधीच घेतलेल्या निर्णयाची फक्त आता अंमलबजावणी करण्यात येत आहे.