मुदतीपूर्वीच होणार बिहार विधानसभा निवडणुका; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

पाच राज्यांच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांतील विजयानंतर भाजपचे सर्व नेते फार उत्साहात असून, ते विरोधकांवर सतत हल्लाबोल करत आहेत.

    पाटणा : पाच राज्यांच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांतील विजयानंतर भाजपचे सर्व नेते फार उत्साहात असून, ते विरोधकांवर सतत हल्लाबोल करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेले रामचंद्र प्रसाद सिंह उर्फ आरसीपी सिंह यांनी दावा केला की, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वीच होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

    ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नितीश कुमारांचा सफाया होईल आणि बिहारमधील महाआघाडीची युती संपुष्टात येईल. त्यामुळे हे लोकच लवकरात लवकर निवडणुका घेतील. मुदतपूर्व होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मला बहुमत मिळेल, असाही दावा त्यांनी केला आहे. प्रादेशिक पक्षांना संधी दिली जात नसल्याच्या जेडीयूच्या वक्तव्यावर आरसीपी सिंह म्हणाले, या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी आहेत.

    जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत ते ठीक आहे, पण जेव्हा आपण राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशबद्दल बोलतो तेव्हा सांगा कुठे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत? छत्तीसगडमध्ये कोणताही प्रादेशिक पक्ष मजबूत नाही. मध्य प्रदेशात एकही प्रादेशिक पक्ष नाही. जेडीयूने तिथून निवडणूक लढवली तेव्हा ते आपली अनामतही वाचवू शकले नाहीत.

    नितीश कुमार मानसिक आजारी

    मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत आरसीपी सिंह म्हणाले, नितीश कुमार मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. ते आधी जसे सरकार चालवत होते तसे आता चालवत नाहीत. सभागृहात महिलांबद्दल अपशब्द वापरणे, दलित नेत्याचा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सभागृहात अपमान करणे ही त्यांची मानसिकता ढासळल्याची लक्षणे आहेत.