‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराज तुरुंगातून बाहेर येणार; आधी परदेशी मुलींशी मैत्री, नंतर करायचा हत्या

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे.

    नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. चार्ल्स हत्येच्या आरोपाखाली 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात बंद होता. चार्ल्सच्या सुटकेचे आदेश देण्याबरोबरच त्याला 15 दिवसांत हद्दपार करण्याचे आदेशही नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

    बुधवारी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले. यासोबतच त्याला 15 दिवसांच्या आत त्याच्या देशात पाठवण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. गुन्हेगारीच्या जगात ‘बिकिनी किलर’ आणि ‘सिरियल किलर’ अशी ओळख असलेल्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

    70 च्या दशकात चार्ल्सने दक्षिण-पूर्व आशियामध्ये 12 पर्यटकांची हत्या केली होती. या सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडून, गळा दाबून, चाकूने आणि जिवंत जाळल्याने झाला होता. व्हिएतनामी वंशाच्या चार्ल्स शोभराजचा जन्म 1944 मध्ये व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात झाला. त्याची आई व्हिएतनामची होती आणि वडील भारतीय वंशाचे होते. चार्ल्सचे खरे नाव हत्तचंद भानानी गुरुमुख चार्ल्स शोभराज असे आहे. मात्र, सध्या गुन्हेगारी जगतात तो बिकिनी किलर आणि सीरियल किलर म्हणून प्रसिद्ध आहे.