चित्त्यांसाठी चितळे सोडण्यावरून बिश्नोई समाज नाराज; पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आयात केलेले चित्ते सोडण्यात आले आहेत. प्राण्यांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या बिष्णोई समाजाने या चित्त्यांच्या खाद्यासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात चितळ आणि हरिण सोडल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. या विरोधात बिष्णोई समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

    चंदिगड : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते (Project Cheetah) सोडण्यावरून बिष्णोई समाजाने (Bishnoi Community) निषेध व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिले आहे. अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया (Devendra Budia) यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) नामिबियातून आणलेल्या ८ चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या (Rajgarh) जंगलातून श्योपूरला १८१ चितळे पाठवण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

    हरियाणातील फतेहाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बिष्णोई समाजाने धरणे आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आयात केलेले चित्ते सोडण्यात आले आहेत. प्राण्यांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या बिष्णोई समाजाने या चित्त्यांच्या खाद्यासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात चितळ आणि हरिण सोडल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. या विरोधात बिष्णोई समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

    देवेंद्र बुडिया यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने आपल्या नेतृत्वाखाली भारतातील जंगलांमधील नामशेष झालेल्या प्रजाती पुनर्संचयित करण्यासाठी नामिबियामधून ८ चित्ते आणले आहेत. परंतु, त्यांचे खाद्य मुख्यत्वे चितळ, हरणे इत्यादी जंगलात सोडल्याने बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.