कोळसा तस्करीचा आरोपी भाजपात; पक्षाच्या दोन गटात हाणामारी

दुर्गापुरात भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात अनेक जण भाजपात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष आणि खासदार अर्जुन सिंह या कार्यक्रमास पोहोचण्यापूर्वी जुने कार्यकर्ते आणि व्यापारी राजेश झा उर्फ राजू यांच्या समर्थकात राडा झाला

कोलकाता. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे तृणमूलचे बंडखोर नेते पक्षांतर करीत असताना त्यात असेही काही चेहरे आहेत ज्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हेही आहेत. या मुद्यावरून आता भाजपाच्या जुन्या नेत्यांनी विरोधाचा स्वर तीव्र केला आहे. नुकतेच एक प्रकरण एका व्यावसायिकाच्या भाजपा प्रवेशाचे आहे. या व्यावसायिकावर कोळसा तस्करीचे आरोप आहेत. व्यावसायिकाच्या भाजपा प्रवेशाच्या मुद्यावरून पक्षातच दोन गट पडले आणि या व्यापाऱ्याची भाजपात एन्ट्री रोखण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाली.

नेते पोहोचण्यापूर्वीच घडला प्रकार
दुर्गापुरात भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात अनेक जण भाजपात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष आणि खासदार अर्जुन सिंह या कार्यक्रमास पोहोचण्यापूर्वी जुने कार्यकर्ते आणि व्यापारी राजेश झा उर्फ राजू यांच्या समर्थकात राडा झाला आणि यांच्यात घटनास्थळी झगडा झाला आणि त्यानंतर मारहाण आणि तोडफोड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्षांनीच दिली होती संमती
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप घोष यांनी स्वत: पुढाकार घेऊन राजेश झा यांना भाजपात समाविष्ट केले. मात्र, जेव्हा ते आपल्या समर्थकांसह कार्यक्रमात आले तेव्हा भाजपाचे जुने कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी व्यापाऱ्यासह आलेल्या लोकांवर हल्ला केला. यावेळी अनेकजण स्टेजवर चढले आणि तेथून टेबल्स फेकल्या. यामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला आणि भाजपचे पश्चिम बर्धवानचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घोरुई यांना घटनास्थळी पोहचून हा संघर्ष थांबवावा लागला.
प्रत्येकजण तस्कर आहेच असे नाही.

भाजपमध्ये आरोपी व्यावसायिकाचा समावेश केल्यावर घोरुई म्हणाले की हा संपूर्ण परिसर कोळशाच्या पट्ट्यात येतो आणि कोणाचाही व्यापार येथे कोळशाशी होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण तस्कर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप घोष यांनी स्वत: पुढाकार घेऊन राजेश झा यांना भाजपात समाविष्ट केले.

शाहनवाज हुसैन यांचे एआयएमआयएमवर टीकास्त्र
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही महत्त्वाचे नेतेमंडळी भाजपामध्ये गेले आहेत. तशातच असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानेही बंगालमध्ये निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमला भाजपाने पैसे देऊन मुद्दाम बंगालमध्ये निवडणुका लढवण्यास प्रवृत्त केलं आहे आणि मुस्लीम मतांचं हे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपा आणि एमआयएम यांची छुपी युती असल्याचे दोन्ही पक्षांवर आरोप होत असताना भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री शाहनवाझ हुसेन यांनी मात्र एमआयएमवर टीका केली आहे. एआयएमआयएम हा रझाकारांचा पक्ष आहे. हे केवळ मुस्लीम लोकांचाच विचार करतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातदेखील हे लोक राजकारण करण्यात व्यस्त होते. १५ मिनिटे पोलिस हटवा, आम्ही हिंदूंना बघून घेऊ अशी वक्तव्य करणारे लोक कायमच धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणे हेच या लोकांचं राजकारण आहे, अशा शब्दात हुसेन यांनी वारिस पठाण यांच्यावर सडकून टीका केली.