nadda modi and shah

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत (National Executive Meeting) बैठकीत सांगितल्याप्रमाणं लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे ४०० दिवस राहिलेले आहेत. अशा स्थितीत लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर नवा मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, हे भाजपाच्या धुरिणांना कळून चुकलेलं दिसतंय.

  नवी दिल्ली: भाजपाच्या (BJP) दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत (National Executive Meeting) नव्या मतदारांपर्यंत पोहचा, हा संदेश अगदी स्पष्टपणे देण्यात आलाय. नवी व्होट बँक(Vote Bank) तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगण्यात आलंय. या वर्षभरात देशात कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या मोठ्या राज्यांसह ९ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत सांगितल्याप्रमाणं लोकसभा निवडणुकीला अवघे ४०० दिवस राहिलेले आहेत. अशा स्थितीत लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर नवा मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, हे भाजपाच्या धुरिणांना कळून चुकलेलं दिसतंय. यासाठी वय वर्ष १८ ते वय वर्ष २५ वयोगटातील तरुण-तरुणींना पक्षाशी जोडून घेण्याबाबत सांगण्यात आलं आहे. सर्व जाती-धर्माच्या मतदारांपर्यंत पोहचण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

  २०१४ ते २०२३ परिस्थितीत काय झालाय बदल ?
  भाजपा २०१४ साली जेव्हा प्रचंड बहुमतानं सत्तेत आली होती, त्यावेळी त्यात तरुणांचा वाटा खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्यावेळी पक्षाकडून सोशल मीडियाचा प्रचंड वापर करण्यात आला होता. तरुणांच्या स्वप्नांना पक्षाच्या वचननाम्यात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. तरुणांनीही भाजपावर विश्वास टाकत भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतदान केलं. त्यानंतर २०१९ सालीही पुन्हा एकदा राक्षसी बहुमतानं भाजपा सत्तेत पुनरागमन करु शकली. दहा वर्षांपूर्वी ज्या तरुणांनी आशेनं मोदी सरकारला मतदान केलं होतं. ती पिढी आता त्यांच्या वयाच्या स्थिरावलेल्या टप्प्यावर आहे. मात्र २०२३ मधील परिस्थिती अजून वेगळी आहे. सोशल मीडियावर सरकारविरोधात थोडीफार का होईना अँटी इक्म्बन्सी दिसू लागली आहे. बेरोजगारी, महागाई याची चर्चा सोशल मीडियावर वाढली आहे. विरोधकांनाही सोशल मीडियाचं हत्यारं आता भाजपामुळं गवसलं आहे.

  नव्या तरुणाईला साद देणार?
  इतिहासात डोकावून पाहिलं तर निवडणुका असो वा आंदोलन, ज्यात तरुणांचा सहभाग असेल, तरुणाईची साथ ज्यांना असेल त्यांनाच यश मिळताना आत्तापर्यंत दिसलं आहे. युवा वर्ग भविष्याचं स्वप्न पाहतात आणि त्याची तुलनाही करीत असतात. त्यामुळेच भाजपा सध्या नव्या तरुणाईला हाक देण्याच्या प्रयत्नात आहे. युवकांची दुसरी पिढी भाजपाला आकृष्ट करायची इच्छा आहे. या तरुणाईला मागची काँग्रेसची राजवट माहित नव्हती, त्याची माहिती त्यांना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशात कुशासन ते सुशासन असा प्रवास झाल्याचं तरुणाईच्या मनावर ठसवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे.

  दक्षिणेचे मोठे आव्हान
  भाजपाला २०१४ आणि २०१९ मध्ये मिळालेल्या बंपर यशाची पुनरावृत्ती २०२४ साली होणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. त्यासाठी १६० लोकसभा मतदारसंघ जिथं भाजपा जिंकू शकलेली नाही, त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येतं आहे. जम्मू-काश्मीर, प. बंगाल, ओरिसा, तामिळनाडू यासारख्या राज्यांकडे विशेष लक्ष देण्यात येतंय. दक्षिण भारतात पाय रोवण्यासाठी भाजपा प्रयत्न करते आहे. दक्षिण भारतात भाजपाच्या आणि नव्या मित्रपक्षांच्या जागा वाढल्या तर त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.

  सर्वधर्मियांना सोबत घेण्याची भाषा कशासाठी
  उत्तर भारतात होणारं नुकसान द. भारतातून भरुन काढण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्यास पंतप्रधानांनी सांगितले त्यामागाचं एके कारण हेही आहे. मुस्लिमांनाही सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. दक्षिणेवर लक्ष ठेवत तामिळ-काशी संगमसारखे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतायेत. सीमावर्ती भागात संपर्क वाढवण्याचं आवाहन भाजपाच्या नेत्यांना करण्यात आलंय. प्राथमिक सदस्यांचे मेळावे घेून भाजपाचा जनाधार अधिक पक्का करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे. हिंदुत्ववादी पक्ष या भूमिकेतून सर्वसामान्यांचा पक्ष होण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी विकास, राष्ट्रवाद आणि सगळ्यांची साथ हाच मंत्र त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी ठरवलेला दिसतोय.