काँग्रेस उमेदवारांच्या यादीत भाजप नेत्याचं नाव; चूक लक्षात येताच काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Madhya Pradesh Election) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील संभाव्य उमेदवारांची यादी तयार केल्यानंतर तिकीट वाटपाचा टप्पा सुरू झाला आहे. यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  अशोक नगर : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Madhya Pradesh Election) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील संभाव्य उमेदवारांची यादी तयार केल्यानंतर तिकीट वाटपाचा टप्पा सुरू झाला आहे. यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  अशोकनगर जिल्ह्यातील मुंगवली विधानसभा मतदारसंघात (Mungwali Constituency) काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत चक्क एका भाजप नेत्याचे नाव आले आहे. यानंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली असून, भाजप नेते पुढे आले. त्यांनी पक्षाला स्पष्टीकरण दिले असून, काँग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलले आहे.

  हे प्रकरण मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्याचे आहे. येथे 15 सप्टेंबरला माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांची सभा होणार आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुशवाह यांच्या लेटरपॅडवर कार्यक्रमाची रूपरेषा आणि जबाबदाऱ्यांबाबत एक पत्र व्हायरल झाले आहे.

  आशिषऐवजी लिहिले दीपक

  कॉंग्रेस मीडिया प्रभारी रितेश जैन म्हणाले, मुंगवली येथील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आशिष पालीवाल यांच्याऐवजी दीपक पालीवाल लिहिले गेले आहे. दीपक पालीवालही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. चूक लक्षात येताच दुरुस्त करण्यात आली. अनेक ठिकाणी नाव लिहिले होते, त्यापैकी एका ठिकाणी बरोबर होते. परंतु, दोन ठिकाणी चुकीचे होते. ही कारकुनी चूक आहे, हे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अनावश्यक मुद्द्यांवरून डोंगर उभा करणे. हेच भाजपचे काम आहे.

  प्रतिमा डागाळल्याचा आरोप

  काँग्रेसच्या यादीत भाजप नेते दीपक पालीवाल यांचे नाव आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दीपक यांनी पत्रपरिषदेत घेऊन याचे खंडन करत कॉंग्रेसवर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला. ‘मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता असून, आमचे चिन्ह कमळ फूल आहे’, असे त्यांनी ठासून सांगितले. तसेच काँग्रेसला विधानसभेत उमेदवार मिळत नसल्याने भाजप नेत्यांची नावे लिहीत असल्याचे ते म्हणाले.