राजस्थानात काँग्रेसला बसणार धक्का?; भाजपची 101 जागांवर आघाडी तर काँग्रेस 72 जागांवर…

राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 साठी राज्यातील एकूण 200 विधानसभा जागांपैकी 199 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आता या निवडणुकांचे निकाल समोर येत आहे.

    नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणूक 2023  (Rajasthan Election Result 2023) साठी राज्यातील एकूण 200 विधानसभा जागांपैकी 199 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आता या निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 199 जागांपैकी भाजप 101 जागांवर तर सत्ताधारी काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती दिली जात आहे.

    राजस्थान विधानसभा निवडणुकीत 75.45 टक्के मतदान झाले होते. पोस्टल बॅलेटची मतमोजणी संपल्यानंतर आता ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 2524 टेबल लावण्यात आले आहेत. राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी, सर्व 36 केंद्रांवर मतमोजणीसाठी 1121 एआरओ कर्तव्यावर आहेत. राजस्थान निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने आता आपला प्रतिस्पर्धी काँग्रेसला मागे टाकले आहे.

    51 हजार 890 मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये मिळालेल्या मतांची मोजणी करण्यासाठी मतमोजणी केंद्रांवर 2524 टेबल लावण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 4245 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. शिव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जास्तीत जास्त 41 फेऱ्या सुरू राहणार असून, अजमेर दक्षिण मतदारसंघातील मतमोजणी केवळ 14 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे.