मध्य प्रदेश अन् राजस्थानमधील भाजपाला मिळालेलं यश मोदी किंवा शाहांचं नाही, तर…; संजय राऊतांची टीका

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात मतमोजणी सुरू आहे. सुरूवातील समोर आलेल्या कलानुसार मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात मतमोजणी सुरू आहे. सुरूवातील समोर आलेल्या कलानुसार मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाला यश मिळालं, तर त्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांचं नाही, तर शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे शिंदे यांचं असेल,” असं राऊतांनी सांगितलं.

    प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “पाचही राज्यात आपलं सरकार येईल, हा भाजपाचा दावा एक विनोद म्हणून घ्यायला हवा. मिझोरामध्ये भाजपा कुठे औषधालाही दिसत नाही. तेलंगणात भाजपा चौथ्या क्रमांकाला आहे. तेलंगणात भाजपाला १० जागाही मिळण्याची शक्यता नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे.”

    शेवटच्या फेरीनंतरच निकाल स्पष्ट होईल

    मध्य प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सलग चौथ्या वेळी भाजपचं सरकार येण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, एकतर्फी निकाल कधीच येत नाही. तेलंगणमध्ये देखील एकतर्फी निकालाचे विश्लेषण आपण ऐकले होते. परंतु आताही तिकडे केसीआर आणि काँग्रेसमध्ये अजूनही टक्कर चालू आहे हे सुरुवातीचे कल आहेत. पंचवीस ते तीस राऊंड मतदानाचे होत असतात. आता पाचवी फेरी चालू आहे सहावी फेरी चालू आहे. त्यामुळे तुम्ही शेवटच्या फेरीपर्यंत थांबायला हवं हे माझे स्पष्ट मत आहे. एक दीड वाजता या संदर्भात स्पष्ट निकाल येईल.