ied found at gazipur

गाझीपूर इथल्या फूल बाजारात स्फोटकांनी भरलेली बॅग (Bomb Found At Ghazipur Flower Market) आढळली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

    दिल्ली : दिल्लीतल्या (Delhi) गाझीपूर इथल्या फूल बाजारात स्फोटकांनी भरलेली बॅग (Bomb Found At Ghazipur Flower Market) आढळली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी ही स्फोटकं जप्त केली आहेत. तसेच ही बॅग आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅग जप्त केल्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला गाझीपूर फूल बाजारात पाठवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्पेशल सेलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नॅशनल सिक्युरिटी गार्डलाही घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

    पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळून आली होती. या बॅगबद्दलची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅग आढळलेला परिसर रिकामा केला आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला घटनास्थळी बोलावलं. हे पथक आल्यानंतर त्यांनी जेसीबी मागवून एक खोल खड्डा खणून बॉम्ब निकामी केला.

    हा बॉम्ब फुटल्यानंतर झालेल्या स्फोटाचा व्हिडीओही हाती येत आहे. त्यावरून हा बॉम्ब प्रचंड मोठ्या क्षमतेचा होता हे सिद्ध होत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.