मनाला चटका लावणारी बातमी; बहिणीच्या जळत्या चितेत भावाने मारली उडी

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात भाऊ-बहिणीच्या हृदयस्पर्शी नात्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीवर अंत्यसंस्कार केले जात होते, यावेळी भाऊ स्मशानभूमीत पोहोचताच त्याने बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतली. आगीत भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर शहराजवळील माझगुवन गावात ही दुःखद घटना घडली आहे(Brother jumps into sister's funreal).

  भोपाळ : मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात भाऊ-बहिणीच्या हृदयस्पर्शी नात्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीवर अंत्यसंस्कार केले जात होते, यावेळी भाऊ स्मशानभूमीत पोहोचताच त्याने बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतली. आगीत भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर शहराजवळील माझगुवन गावात ही दुःखद घटना घडली आहे(Brother jumps into sister’s funreal).

  माझगुवन गावात गुरुवारी सायंकाळी शेतात बांधलेल्या विहिरीत पडून ज्योती या मुलीचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर शनिवारी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिचा चुलत भाऊ करण सिंह हा गावापासून 430 किमी लांब असलेल्या असलेल्या धार येथून घरी पोहोचला आणि रडत रडत थेट स्मशानभूमीत गेला.

  बहिणीची चिता जळत होती. ते पाहून करणने जळत्या चितेला नमस्कार केला आणि त्या चितेत उडी घेतली. नेमके काय झाले ते लोकांना समजू शकले नाही. मुलीच्या भावाने उचलेले हे पाऊल पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण हादरले. यावेळी त्याची तातडीने चितेतून सुटका करण्यात आली. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात भाजल्याने रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

  मृत मुलाचा मोठा भाऊ शेरसिंग ठाकूर यांनी सांगितले की, ज्योती गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शेतात गेली होती. ती रोज शेतात भाजी तोडायला जात असे. त्या दिवशी ती बराच उशीर होऊन देखील घरी परतली नाही. आम्हाला वाटले ती मैत्रिणीच्या घरी राहिली असावी. रात्र झाली होती, तरीही तिचा पत्ता लागला नाही. आम्ही तिचा 12 वाजेपर्यंत शोध घेतला मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी शेतातील विहिरीत ज्योतीचा मृतदेह पडलेला होता.

  पोलिसांनी आता मुलीच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ज्योतीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ती चुकून विहिरीत पडली की तिला खाली ढकलले गेले. याचा पोलीस तपास करत आहेत.

  चुलत भाऊ करणच्या मृत्यूबद्दल त्याचे वडील उदय सिंह यांनी सांगितले की, बहिणीच्या मृत्यूची बातमी मिळताच ते शुक्रवारी संध्याकाळी सागरकडे निघाले. करण दुःखी होऊन एवढे मोठे पाऊल उचलेल हे आम्हाला माहीत नव्हते. शनिवारी करणचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी तपासासाठी पाठवला होता. रविवारी सकाळी बहीण ज्योतीच्या चितेजवळ त्याच्या कुटुंबीयांनी करणच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

  ठाणे बहेरियाचे टीआय दिव्य प्रकाश त्रिपाठी यांनी सांगितले की, ज्योती उर्फ ​​प्रीती ही विहिरीतून पाणी भरत होती. पाय घसरल्याने ती विहिरीत पडली आणि बुडून तिचा मृत्यू झाला. यानंतर त्याचा चुलत भाऊ करण धार येथून माझगुवन गावात पोहोचला आणि आपल्या बहिणीच्या जळत्या चितेत झोपला. तो गंभीररीत्या भाजला. त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिस करत आहेत.