देशातील पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीची सरशी; सातपैकी चार जागा जिंकल्या

  नवी दिल्ली : इंडिया आघाडीनंतर झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकांमध्ये आघाडीतील पक्षांना चांगले यश मिळाले असून सातपैकी चार जागांवर विजय मिळविला आहे. यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या घोसी पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धक्का मानला जात आहे.
  सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका
  ५ सप्टेंबरला सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांचा आज लागला असून यात इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशातील घोसी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले. गेल्यावर्षी या मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून निवडून आलेले दारासिंग चौहान यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात निवडणुकीत झाली आहे. दारासिंग चौहान यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने सुधाकर सिंह यांना उतरविले होते.
  इंडिया आघाडीसाठी सुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक
  समाजवादी पक्षासाठी ही प्रतिष्ठेची तसेच इंडिया आघाडीसाठी सुद्धा प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत काँग्रेस व बसपने उमेदवार रिंगणात उतरविले नव्हते. याचा फायदा सुधाकर सिंह यांना निश्चित झाला. यामुळे ४० हजारांपेक्षा अधिक मताधिक्यांची आघाडी त्यांनी घेतली. या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चाणक्यनितीला धक्का लागला आहे. झारखंडमध्ये दुमरी मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी यांनी विजय संपादन केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
  उत्तराखंडमध्ये बागेश्वर विधानसभा निकाल
  उत्तराखंडमध्ये बागेश्वर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार पार्वती दास यांचा २४०५ मतांनी विजय झाला. बागेश्वर पोटनिवडणुकीसाठी ५ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. ज्यामध्ये ५५.४४ टक्के मतदान झाले.
  केरळमधील पोडनिवडणूक निकाल
  केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या निधनानंतर झालेल्या पुथुपल्ली मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे त्यांचे सुपुत्र चंडी ओमेन यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर सीपीआयचे जॅक थॉमस राहिले असून यात निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी अनामत रक्कम जप्त झाली आहे.
  त्रिपुराच्या दोन्ही जागा सत्तारुढ भाजपने आपल्याकडे राखल्या आहेत. बॉक्सानगरमधून तफज्जल हसन व धनपूर मतदारसंघातून बिंदू देवनाथ विजयी झाल्या आहेत. उत्तराखंडच्या बागेश्वर मतदारसंघातून भाजपच्या पार्वती दास निवडून आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील धुपगिरी मतदारसंघातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसने आपला दबदबा कायम राखला आहे. या मतदारसंघातून निर्मल चंद्र रॉय विजयी झाले आहेत.
  विजयी उमेदवार
  घोसी (उत्तर प्रदेश): सुधाकर सिंह (समाजवादी पक्ष)
  दुमरी (झारखंड) : बेबी देवी (झामुमो)
  पुथुपल्ली (केरळ): चंडी ओमेन (यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट UDF)
  बॉक्सानगर (प.बंगाल): तफज्जल हसन (भाजप)
  धनपूर (प. बंगाल) : बिंदू देवनाथ (भाजप)
  धुपगिरी (प.बंगाल): निर्मलचंद्र रॉय (तृणमूल)
  बागेश्वर (उत्तराखंड) : पार्वती दास (भाजप)