air india and campbell wilson

एअर इंडियाचे (Air India) नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

    मुंबईः टाटा समूहाने (Tata Group) एअर इंडियाच्या (Air India) बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाचे नवे सीईओ (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅम्पबेल विल्सन यांना एव्हिएशन इंडस्ट्रीचा २६ वर्षांचा अनुभव आहे. कॅम्पबेल विल्सन हे यापूर्वी स्कूट एअरलाइन्सचे सीईओ होते.

    कॅम्पबेल विल्सन यांनी १९९६ मध्ये सिंगापूर एअरलाइन्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते न्यूझीलंडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी होते. नंतर कंपनीने त्यांना कॅनडा, हाँगकाँग आणि जपानमध्ये कामासाठी पाठवले. पुढे ते २०११ मध्ये सिंगापूरला परतले आणि स्कूटच्या स्थापनेपासून ते २०१६ पर्यंत कंपनीचे सीईओ होते. स्कूट ही सिंगापूर एअरलाइन्सची लो-कॉस्ट सर्व्हिस देणारी उपकंपनी आहे.

    यानंतर पुढे विल्सन यांनी सिंगापूर एअरलाइन्समध्ये सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले. तेथे त्यांनी प्राइसिंग, डिस्ट्रिब्युशन, ई-कॉमर्स, मर्चेंडाइजिंग, ब्रँड आणि मार्केटिंग, ग्लोबल सेल्स हाताळले. कंपनीने त्यांना पुन्हा एकदा एप्रिल २०२० मध्ये स्कूट एअरलाइन्सच्या सीईओ पदाची जबाबदारी दिली.

    टाटा समूहाचा एक भाग बनणे आणि एअर इंडियासारख्या ब्रँडचे नेतृत्व करणे हा त्यांच्यासाठी बहुमान आहे. एअर इंडिया आता जगातील सर्वोत्तम एअरलाइन बनण्याच्या प्रवासावर आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा प्रदान करेल, अशी प्रतिक्रिया कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या नियुक्तीनंतर व्यक्त केली आहे.