कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार; १९ सप्टेंबरचा मुहूर्त

नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दरम्यान त्यांच्यासोबत पंजाबचे ६ ते ७ माजी आमदारही प्रवेश करणार असल्याचे समजते.

    चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) त्यांचा ‘पंजाब लोक काँग्रेस’ (Punjab Lok Congress) पक्ष भाजपमध्ये (BJP) विलीन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाढदिवसानंतर दोन दिवसांनी १९ सप्टेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत.

    नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दरम्यान त्यांच्यासोबत पंजाबचे ६ ते ७ माजी आमदारही प्रवेश करणार असल्याचे समजते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर सिंग, मुलगी जय इंदर कौर आणि नातू निर्वाण सिंग यांचा समावेश आहे.

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रणीत कौर (Praneet Kaur) अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. त्या पंजाबमधील पटियालातील काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी नवज्योतसिंग सिध्दू यांच्याशी झालेल्या हाय-प्रोफाइल वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात निवडणूक लढवली. या सर्व वादानंतरही प्रणीत कौर यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही.