कोरोनानंतर आता आला ‘हा’ भयानक आजार; दोघांचा मृत्यू तर देशात केसेसच्या संख्येत वाढ

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवा व्हायरस डोके वर काढू पाहत आहे.

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवा व्हायरस डोके वर काढू पाहत आहे. H3N2 इन्फ्लूएन्झा (H3N2 Influenza) हा घातक व्हायरस असून, याच्या संसर्गाने दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि कर्नाटकमध्ये इन्फ्लूएन्झाच्या संसर्गाने प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत H3N2 चे 90 रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा वाढण्याचा अंदाज वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

हिरा गौडा असे या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरा गौडा यांचा मृत्यू 1 मार्च रोजी झाला. ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण होते. तपासणीदरम्यान नमुना घेण्यात आला होता. त्यातून संबंधित रुग्णाला H3N2 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. देशभरात याचे रुग्ण वाढत आहेत. आत्तापर्यंत 90 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

मास्क वापरा, काळजी घ्या

सार्वजनिक ठिकाणी वावरताना विशेष काळजी घेतली पाहिजे. लोकांना H3N2 इन्फ्लूएन्झापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा व्हायरस कोरोनासारखा पसरतो. हे टाळण्यासाठी मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा आणि हात वारंवार धुवा. वृद्ध तसेच इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यापेक्षा जास्त समस्या असू शकतात, अशी माहिती एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.

राजस्थानमध्ये विविध केसेस

राजस्थानमध्ये H3N2 च्या अनेक केसेसची नोंद होत आहे. यामध्ये लहान मुलांना याची बाधा होण्याची जास्त शक्यता असते. त्यांना बरे होण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागत आहे. मुलांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागते.