health minister mansukh mandviya

कोरबीव्हॅक्स (Corbevax) आणि कोव्होव्हॅक्स (Covovax )लस आणि अँटी-व्हायरल औषध मोल्नुपिरावीरला आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Anti-Viral Drug Molnupiravir) मान्यता दिली आहे.

    आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी कोरबीव्हॅक्स (Corbevax) आणि कोव्होव्हॅक्स (Covovax )लस आणि अँटी-व्हायरल औषध मोल्नुपिरावीरला (Anti-Viral Drug Molnupiravir) मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandaviya) यांनी ट्विटद्वारे याविषयीची  माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टीट्यूटच्या कोव्होव्हॅक्स या कोरोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली होती. त्यामुळे आता कोरोनाविरोधातल्या आणखी दोन लशींची आणि एका औषधाची भर पडली आहे.

    याविषयी ट्विट करत मांडविया म्हणाले, “कोरबीव्हॅक्स लस ही कोविड १९ विरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे, जी हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई कंपनीने बनवली आहे.” सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या विषय तज्ञ समितीने (एसईसी) सीरमद्वारे कोव्होव्हॅक्स आणि बायोलॉजीकल ई द्वारे कोरबीव्हॅक्स या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरीची शिफारस केली आहे. अँटी-व्हायरल कोविड गोळी मोल्नुपिरावीरची देखील भारतात मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

    याआधी भारत सरकारने हैदराबादमधील बायलॉजिकल ई या कंपनीकडून बनवण्यात येणाऱ्या कोरबीव्हॅक्स (Corbevax) या लसीच्या ३० कोटी डोससाठी अ‍ॅडव्हान्स ऑर्डर दिली आहे. ही पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. तसेच कोरबीव्हॅक्स ही भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोरोना लसींपैकी सर्वात स्वस्त लस ठरणार आहे.

    तसेच कोव्होव्हॅक्सला ‘डब्ल्यूएचओ’ने मान्यता दिल्यानंतर ही लस सुरक्षित आहे, तसेच तिची परिमाणकारकताही सिद्ध झाल्याचे अदर पुनावाला यांनी म्हटले होते. दर्जा, सुरक्षितता आणि परिणामकारकता, जोखीम व्यवस्थापन आराखडा आदींबाबतच्या भारताच्या औषध महानियंत्रकांच्या अहवालाच्या आधारे ‘कोव्होव्हॅक्स’ला आपत्कालीन मंजुरी देण्यात आल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले होते.

    दरम्यान, देशाच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होव्हॅक्सला काही अटींसह आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी ऑक्टोबरमध्ये ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडे अर्ज सादर केला आणि आपत्कालीन परिस्थितीत कोव्होव्हॅक्सच्या मर्यादित वापरास परवानगी देण्याची विनंती केली.