health minister mansukh mandviya

कोरोना संपलेला नाही, तेव्हा कोरोनाबाबत आखलेल्या नियमांची तसेच लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी राज्यांना केले.

    गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाबाधितांची (Corona Update)संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने आज राज्यांची आढावा बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक (Health Minister Meeting) घेण्यात आली. या माध्यमातून झालेल्या या बैठकीत देशातील कोरोना संसर्गाची स्थिती, लसीकरण याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये राज्यातील आरोग्यमंत्री, सचिव सहभागी झाले होते. कोरोना संपलेला नाही, तेव्हा कोरोनाबाबत आखलेल्या नियमांची तसेच लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी राज्यांना केले.

    कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्कात आलेल्यांचा शोध आणि कोरोना विषाणूच्या जनुकीय क्रमानिर्धारणाकडेही लक्ष ठेवावे असेही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. विशेषतः काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्द्ल आवश्यक पावले उचलण्याच्या सुचना यावेळी मनसुख मांडवीय यांनी केल्या आहेत. यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकताही व्यक्त केली.

    निर्बंध जरी हटवण्यात आले असले तरी जे कोरोनाबाबतचे नियम लागू आहेत त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यात यावे. विशेषतः परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या, आरोग्य सुविधा, लसीकरण याकडे लक्ष द्या, असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.

    हर घर दस्तक मोहिम, १२ ते १७ वयोगटाचे लसीकरण, १८ ते ५९ वयोगटासाठी वर्धक लस, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण यावर भर द्यावा अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना या बैठकीच्या माध्यमातून केल्या. तसंच कोरोनाच्या लसी या वाया जाणार नाही, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.