amit shah on shraddha walkar murder case

दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी,ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

    दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी  (Shraddha Walkar Murder Case)  पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष म्हणजेच सरकारी पक्ष श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देईल असं त्यांनी सांगितलं आहे. पत्रकारांसमोर त्यांनी हे म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते.

    दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये शाह यांनी, “ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) घेतील,” असा विश्वास व्यक्त केला आहे. आफताब पुनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकरचा १८ मे रोजी दिल्लीतील राहत्या घरी गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. पुढचे काही दिवस तो या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता.

    श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाने वकिलातर्फे मंगळवारी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा आपल्याकडून रागाच्या भरात झाला. आफताबच्या कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्यात आली. तसेच त्याची लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असंही आफताबने न्यायालयासमोर सांगितलं आहे.

    मंगळवारी आफताबच्या वकिलांनी सांगितले, की आफताबला या शहराची संपूर्ण माहिती नसल्याने त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केलेले अवयव नेमके कुठे फेकले, ती ठिकाणे ओळखण्यास त्याला अडचण येत आहे. आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे. तपास सुरू असल्याने आफताबच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.