चांद्रयान-3 चे लँडर प्रोपल्शनपासून झाले वेगळे; 23 ऑगस्टला चंद्रावर होणार लँडिंग

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चे यशस्वी प्रक्षेपण केलं. हे यान 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे. इस्रोने आज म्हणजेच 17 ऑगस्टला चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे केले.

    नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चे यशस्वी प्रक्षेपण केलं. हे यान 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे. इस्रोने आज म्हणजेच 17 ऑगस्टला चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे केले. आता प्रोपल्शन मॉड्यूल 3 ते 6 महिने चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल, तर लँडर-रोव्हर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

    चांद्रयान पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले तेव्हा त्याची कक्षा 164 किमी x 18,074 किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी चंद्राची छायाचित्रेही टिपली. इस्रोने त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. या चित्रांमध्ये चंद्राचे खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत. 16 ऑगस्टला सकाळी 8:30 च्या सुमारास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यानाचे थ्रस्टर काही काळासाठी सुरू केले होते. यानंतर चांद्रयान 153 किमी X 163 किमीच्या जवळपास वर्तुळाकार कक्षेत आले होते.

    22 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यानंतर यान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात यावे, म्हणून त्याचा वेग कमी करण्यात आला.