
याच वर्षी ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यात १२ चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. तर काही दिग्गजांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला होता. नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं भाजपा खासदारांमध्येही कुणाला संधी मिळणार, यावर चर्चा झडू लागलेल्या आहेत.
नवी दिल्ली– संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीनंतर कधीही मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि कुणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार, याची यादीही तयार असल्याचं सांगण्यात येतंय. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची तयारी सुरु झाली असून, पक्ष संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी मंत्रिमंडळातील काहीजण पक्षात सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर काही जणांना नव्या मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. याच वर्षी ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यात १२ चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. तर काही दिग्गजांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला होता. नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं भाजपा खासदारांमध्येही कुणाला संधी मिळणार, यावर चर्चा झडू लागलेल्या आहेत.
मकर संक्रांतीनंतर कधीही होऊ शकतो फेरबदल
मकर संक्रांतीनंतर कधीही मंत्रिमंडळ फेरबदल होऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिलेले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ फेरबदल असण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्या राज्यांच्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळू शकेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा फेरबदल होईल, असे सांगण्यात येतेय.
शिंदे गटालाही संधी
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील १२ खासदार हे शिंदे गटासोबत गेले आहेत. त्यातील दोघांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यात राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा होतेय. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळं शिवसेना एनडीएतून बाहेर पडली होती. त्यावेळी शिवसेनेकडे असलेली मंत्रिपदं ही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.
राज्याच्या समीकरणांचा विचार होणार
राजकीय समीकरणं आणि जातीय समीकरणांचा विचार करुन हा मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याचं सांगण्यात येतंय. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच त्या त्या राज्यांच्या खासदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य दिल्यामुळे भाजपा विरोधकांवर मात करु शकेल असा विश्वासही वर्तवण्यात येतोय.
मंत्र्यांच्या कामगिरीचाही होणार विचार
ज्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येईल, त्यात सुमार कामगिरी केलेल्या मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. फेरबदलापूर्वी मंत्र्यांचे प्रगतीपुस्तकही तपासले जाणार आहे. ज्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्यांना वगळण्यात येणार नाही. लोकसभेतील खासदारांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. या खासदारांना काही महत्त्वाची खाती दिली जातील. गुजरात निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या भाजपाच्या राज्यातील खासदारांनाही मंत्रिपद देऊन, गौरवण्यात येण्याची शक्यता आहे. महिला आणि वंचित समाजातील खासदारांचाही यात समावेश असण्याची शक्यता आहे.
यादी तयार, फक्त तारीख जाहीर होणे बाकी
भाजपा पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार केली असल्याची माहिती आहे. आता केवळ तारखेकडे लक्ष असल्याचं सांगण्यात येतय. भाजपा पक्ष आणि भाजपाशासित राज्यांमध्ये चांगला समन्वय असावा यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत.