केंद्र आणि राज्य एकाच विचाराचं असल्यानं उत्कर्ष नक्की – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अडीच वर्षापूर्वी जे व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं.

    दिल्ली  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्लीमध्ये आहेत, शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला. अडीच वर्षापूर्वी जे व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे, असं ते यावेळी म्हणाले.

    यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांचा उल्लेख गटनेते म्हणून केला. तर खासदार भावना गवळी यांचा उल्लेख त्यांनी मुख्य प्रतोद म्हणून केला. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, भावना गवळी या मुख्य प्रतोद असून याबाबतचं पत्र आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे.

    आम्ही जी भूमिका घेतली आहे ती बाळासाहेबांच्या विचारांची आहे, तीच भूमिका आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली आहे. तशा आशयाचं पत्र आज आम्ही लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेला आणि राज्य सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्र आणि राज्य एकाच विचाराचं असल्यानं उत्कर्ष नक्की होणार, असंही ते म्हणाले.

    मी पक्षप्रमुख झालो नाही मी मुख्यमंत्री झालो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. कुठलंही नियमबाह्य काम केलेलं नाही, असंही ते म्हणाले.