toll plaza
संग्रहित फोटो

टोलनाक्यावरील वाद (Toll Plaza Clashes) अनेकांच्या परिचयाचा असेल. काहीना काही कारणामुळे वाद होतो आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात कर्नाटकात बूम बॅरिअर उघडण्यास उशीर झाल्यामुळे टोल प्लाझा कर्मचाऱ्याची हत्या (Murder of Toll Plaza Worker) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    बंगळुरू : टोलनाक्यावरील वाद (Toll Plaza Clashes) अनेकांच्या परिचयाचा असेल. काहीना काही कारणामुळे वाद होतो आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात कर्नाटकात बूम बॅरिअर उघडण्यास उशीर झाल्यामुळे टोल प्लाझा कर्मचाऱ्याची हत्या (Murder of Toll Plaza Worker) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पवन कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. राजधानी बंगळुरूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या रामनगरा येथील बिदादी शहरात ही घटना घडली. यामध्ये झालेल्या हल्ल्यात पवन याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र मंजुनाथ हा गंभीर जखमी झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ‘बिदाडी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी बंगळुरू येथील असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे’.

    चौघे कारने जात होते म्हैसूरच्या दिशेने

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चार जण म्हैसूरच्या दिशेने कारमधून जात होते. जेव्हा ते टोल प्लाझाजवळ पोहोचले तेव्हा टोल बॅरिअरचा मोठा अडथळा झाला. यावरून त्यांचा टोल प्लाझा कर्मचाऱ्याशी वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली.

    कर्मचाऱ्याची वाट पाहत होते रस्त्यावर

    टोल प्लाझा कर्मचाऱ्याशी भांडण झाल्यानंतर चार आरोपी तेथून काही अंतरावर थांबले. हे सर्वजण पवन कुमार आणि त्याच्या मित्राच्या येण्याची वाट पाहत होते. मध्यरात्री 12 वाजता पवन आपल्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी टोल बुथच्या बाहेर आला. दरम्यान, वाटेत उभ्या असलेल्या चौघांनी त्याच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला. दोघांनाही बेदम मारहाण करून ते घटनास्थळावरून पळून गेले. यामध्ये पवन कुमार याचा मृत्यू झाला.