सिक्कीममध्ये ढगफुटी झाल्याने नदीनाल्यांना पूर, लष्कराचे २३ जवान बेपत्ता, शोध मोहीम सुरू!

उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला. येथे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि पूर आला. पुराच्या पाण्यात वाहने वाहून गेल्याने लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत.

    यावर्षी देशात अनेक राज्यांना पावसानं चांगलचं झोडपलं. अनेक राज्यात ढगफुटी झाल्याने अतोनात नुकसान झालं. नुकतंच नागपूरमध्येही मुसळधार पावसामुळे पुर येऊन शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान  झालं तर 4 ते 5 जणांना आपला जीवही गमवावा लागला. आता सिक्कीम राज्यात अक्षरश: ढगफुटीमुळे (cloud burst in Sikkim) झाल्यामुळे तिथल्या नदीनाल्यांना पूर आला. या पुराचा फटका अनेक लष्करी आस्थापनांनाही याचा फटका बसला असून लष्कराचे २३ जवान बेपत्ता (Army Personnel Missing in Sikkim)झाल्याचे वृत्त आहे. या जवानांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
    अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीमच्या लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला मंगळवारी रात्री आलेल्या महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. पुरामुळे परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

    सिक्कीममधील तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीममधील सिंगथम फूटब्रिजही कोसळला आहे. जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या खालचा भाग रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला असून नदीकाठावरून प्रवास करणे टाळावे.

    या पार्श्वभूमीवर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचले आहे.