कर्नाटकात कुकर बॉम्बचा स्फोट! दहशतवादी कट असल्याचा संशय

कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणात सांगितलं की, मंगळुरूमधील ऑटोमध्ये झालेला स्फोट हा अपघात नसून दहशतवादी घटना आहे. कर्नाटक पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

    मंगळुरु : कर्नाटकातील मंगळुरुमध्ये एका चालत्या ऑटो रिक्षात कुकर बॉम्बचा स्फोट झाला. 19 नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडली असून यात बॉम्बचा स्फोट झाल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी आरोपी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलिसांकडून या दुर्घटनेचा तपास सुरु आहे. ही घटना दहशतवादी कट असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दहशत पसरवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणीस आरोपींकडून ब्लास्ट करण्यात येणार होता मात्र चुकून रिक्षातच या कुकर बॉम्बचा स्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांना आरोपी प्रवासीकडून बॅटरी, वायर आणि सर्किट असलेला कुकर जप्त केला आहे.

    कर्नाटकातील मंगळुरू येथे शनिवारी झालेल्या ऑटो स्फोटाच्या घटनेचा दहशतवादी अँगल समोर आला आहे. ऑटोमध्‍ये प्रवास करणार्‍या प्रवाशाने बॅगेत कुकर बॉम्ब ठेवला होता आणि त्याचा स्फोट झाला. कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणात सांगितलं की, मंगळुरूमधील ऑटोमध्ये झालेला स्फोट हा अपघात नसून दहशतवादी घटना आहे. कर्नाटक पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले की, या प्रकरणी संशयित दहशतवाद्याली मदत केल्याचा आरोपात कर्नाटकात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

    मुख्य आरोपीने अन्य ठिकाणी स्फोट घडवण्याची योजना आखली होती, मात्र चुकून नागुरी येथे स्फोट झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. म्हैसूर शहर पोलिसांनी मंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या रविवारी (20 नोव्हेंबर) घराची झडती घेतली आणि काही साहित्य जप्त केलं. शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्याजवळ एका ऑटोरिक्षात स्फोट झाला, त्यात प्रवासी आणि चालक जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुख्यमंत्री बसवराज बोम्मई काय म्हणाले? 

    मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितलं की, संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली असता, घटनास्थळावरून जप्त केलेल्या आधारकार्डमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आहेत. संशयिताकडे डुप्लिकेट आधार कार्ड होते. त्यात हुबळीचा पत्ता होता. या प्रकरणाच्या कर्नाटक पोलिसांसोबत तपासात एनआयए आणि आयबीचे अधिकारीही मिळून तपास करत आहेत. मंगळुरू येथे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या संशयिताचे दहशतवादी संबंध आहेत. कारण त्याने तामिळनाडूमधील कोईम्बतूरसह विविध ठिकाणी भेट दिली होती. संशयित आरोपी ब्लास्टमध्ये जखमी झाल्यामुळे सध्या रुग्णालयात आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर पुढील तपास केला जाईल.