राज्यातली कोरोना रुग्णवाढ चिंताजनक- देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले १० पैकी ८ जिल्हे महाराष्ट्रात

देशातील(corona in India) दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. यापैकी ८ जिल्हे महाराष्ट्रात (corona patients in maharashtra)आहेत. याशिवाय दिल्ली आणि बंगळुरू अर्बनमध्येही कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे.

  मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा (corona patients in India)दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. राज्यात या वर्षातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. यापैकी ८ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. याशिवाय दिल्ली आणि बंगळुरू अर्बनमध्येही कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बंगळुरू अर्बन, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. सध्या केवळ काही जिल्ह्यांची अवस्था गंभीर असली तरी, संपूर्ण देशावर संभाव्य धोका आहे. कोरोना व्हायरस थांबविण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी सर्व पावले उचलणे आवश्यक आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले.

  ८० टक्के ऑक्सिजन राखीव
  राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने मंगळवारी अधिसूचना काढली असून ती ३० जूनपर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्या वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

  रुग्णालयांना प्राधान्य
  राज्यातील ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्प्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने हे आदेश जारी केले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे.

  डबल म्युटेशन असलेल्या कोरोनाने वाढला प्रादुर्भाव
  देशात कोरोनामध्ये डबल म्युटेशन झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे लस प्रभावी ठरेल का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. मात्र, या डबल म्युटेशन असलेल्या कोरोनाला अजिबात घाबरण्याची गरज नाही, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पण यामुळे खरचं चिंतेची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हायरस आपले स्वरुप सातत्याने बदलत असतो. भौगोलिक स्थितीनुसार ते वेगवेगळे असू शकतात. महत्त्वाचे म्हणजे त्याचा प्रादुर्भाव आणि त्याच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोरोनाच्या नवीन प्रकाराने घाबरण्याची अजिबात गरज नाही. हा लवकरच संपेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  ४३० जिल्ह्यांमध्ये यश
  देशात एकूण ४३० जिल्हे असे आहेत की तिथे कोरोनाला रोखण्यात यश आल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले आहे. देशात कोरोनाबाबत स्थिती सध्यातरी नियंत्रणात आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा वाढल्यास रुग्णसंख्या वाढेल. त्यामुळे कोरोनाची नियमावली पाळा असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.