Union Health Secretary, Rajesh Bhushan  (फोटो साभार : ANI)
Union Health Secretary, Rajesh Bhushan (फोटो साभार : ANI)

देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बुधवारी आरोग्य मंत्रालयाची बैठक पार पडली.

    नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बुधवारी आरोग्य मंत्रालयाची बैठक पार पडली. या दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या १० जिल्ह्यांत केंद्रीत आहे. हे जिल्हे आहेत- पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगळुरू शहर, नांदेड, जळगाव, अकोला या १० जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे त्यात ९ जिल्हे महाराष्ट्रातील असून एक जिल्हा कर्नाटकातील आहे.

    दोन राज्य महाराष्ट्र आणि पंजाब आमच्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसचे २८,००० हजारांहून अधिक नवीन रुग्णसंख्या समोर आली आहे आणि पंजाबमध्ये आपल्या एकूण लोकसंख्याच्या प्रमाणात अधिक प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत असल्याचेही ते पुढे म्हणाले.

    केंद्रीय आरोग्य सचिव लसीकरणाबाबत म्हणाले की, सरकारने निर्णय घेतला आहे की, १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांनाही कोरोनाची लस घेता येणार आहे. हा निर्णय अशासाठी घेण्यात आला आहे कारण आपल्या देशात कोरोना व्हायरसने एकूण ८८ टक्के लोकांचा मृत्यू ४५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांचा झाला आहे.