राजस्थानातील गोरक्षक मोनू मानेसरला अटक! दोन मुस्लीम तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी सरकारची कडक कारवाई

    चंदीगड : राजस्थानातील नासिर आणि जुनैद या दोन तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी कथीत गोरक्षक मोनू मानेसर याला अखेर हरयाणा पोलिसांनी अटक केली आहे. सात महिन्यांनंतर मानेसरला अटक झाली आहे. यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. दरम्यान, नूंह कोर्टानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हरयाणातील नूंह इथंल्या हिंसाचाराला मानेसरनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट कारणीभूत ठरली आहे. (Cow guard Monu Manesar finally arrested for murder of two Muslim youths in Rajsthan)
    आयएमटी मानेसर इथं हरयाणा पोलिसांच्या सीआयए स्टाफनं मंगळवारी पकडलं. दुपारी सुमारे १२ वाजता साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी मोनूच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईचं एक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाला आहे. दरम्यान, गुरुग्राम पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी मोनू मानेसरला अटक केलेली नाही तर सीआयए स्टाफनं त्याला ताब्यात घेतलं.
    स्वतःला गोरक्षक म्हणवून घेणारा मोनू मानेसर हा भिवानी जिल्ह्यात जिवंत जाळण्यात आलेल्या नासिर आणि जुनैद हत्याकांडांनंतर आठ महिने फरार होता. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी हरयाणाच्या भिवानीमध्ये बोलेरे इथं जळालेल्या अवस्थेत दोन मृतदेह मिळाले होते.
    तपासात समोर आलं होतं की, हे दोन्ही मृतदेह राजस्थानच्या गोपालगढमधील जुनैद आणि नासिर यांचे होते. हरयाणाच्या अनेक गोरक्षकांवर या दोन मुस्लिम तरुणांच्या हत्येचा आरोप होता. यांपैकी मोनू मानेसर ऊर्फ मोहित यादव यांच्यापैकी सर्वाधिक चर्चेत होता.
    मोनू मानेसर हा बजरंग दलाचा सदस्य आणि गोरक्षक आहे. हरयाणातील गुरुग्राम इथल्या मानेसरचा तो रहिवासी आहे. बजरंग दलाच्या गाय संरक्षण टास्क फोर्स तसेच गोरक्षक दलाचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. ३१ जुलै २०२३ मध्ये हरयाणातील नूंह इथं हिंसाचार भडकवल्याप्रकरणातही त्याचं नाव सामिल होतं. मोनू याच्यासह या हिंसाचारातील प्रमुख आरोपी बिट्टू बजरंगी याचा एक भडकाऊ व्हिडिओ देखील समोर आला होता.