दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायबर हल्ला?

एम्स रुग्णालयाच्या ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने रुग्णांची देखभाल व्यवस्था विस्कळीत झाली असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मोठा सायबर हल्ला असल्याची शंका उपस्थित करत सरकारी पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स या संस्थेचा दिल्ली येथील सर्व्हर दोन दिवस उलटूनही अद्याप सुरळीत झालेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही गुरुवारी संध्याकाळी बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे. काल सायंकाळी उशिरा एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती मिळत आहे. एम्स व्यवस्थापनाने एका निवेदनात रॅन्समवेअर सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली होती परंतु सुरक्षा यंत्रणांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

    एम्स नवी दिल्ली सर्व्हर हॅक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सुमारे 11-12 तास सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एम्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस तपास करत आहेत. एम्समध्ये सर्व्हर बंद झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. देशाच्या सर्वोच्च एजन्सी ज्या प्रकारे तपासात सामील झाल्या आहेत, त्यावरून ही घटना देशाच्या सुरक्षेशी निगडीत असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.

    एम्स रुग्णालयाच्या ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने रुग्णांची देखभाल व्यवस्था विस्कळीत झाली असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मोठा सायबर हल्ला असल्याची शंका उपस्थित करत सरकारी पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    रॅन्समवेअर हल्ल्याची शक्यता :

    AIIMS ने एका निवेदनात म्हटले आहे की, AIIMS मध्ये काम करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (NIC) टीमने माहिती दिली आहे की हा रॅन्समवेअर हल्ला असू शकतो. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी याची चौकशी करतील. एम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सर्व्हर बंद झाल्यामुळे स्मार्ट लॅब, बिलिंग, अहवाल तयार करणे आणि अपॉइंटमेंट सिस्टमसह ओपीडी आणि आयपीडी डिजिटल हॉस्पिटल सेवा प्रभावित झाल्या आहेत.”

    डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि NIC ची मदत घेतली जात आहे. तसंच, भविष्यात अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी एम्स आणि एनआयसीकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.