ayodhya ram mandir dhanushya and stone

अयोध्येत (Ayodhya News) जर भव्य राम मंदिर तयार होत असेल तर श्रीरामाचं सासर असलेल्या नेपाळमधील जनकपूरमधून काहीतरी योगदान स्वीकारलं गेलं पाहिजे, या विचाराने शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत.

    अयोध्या : शाळिग्राम शिळा अयोध्येला (Ayodhya) पोहोचल्या आहेत. मात्र अजून हे निश्चित झालेलं नाही ही राम ललाची मूर्ती याच शिळेपासून बनेल की नाही. मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं की, मूर्तीतज्ञ याचं परीक्षण करुन याच्या उपयुक्ततेविषयी आपलं मत मांडतील. परीक्षणातून हे उघड होईल की शिळेतला आतला भाग कसा आहे.

    शिळांचं होणार परीक्षण
    चंतप राय म्हणाले की, शक्यतो या शाळिग्रामापासूनच रामललाची मूर्ती बनवण्याच्या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आलं आहे. मात्र काही अडचण जाणवली तर पर्याय म्हणून ओडिसा आणि कर्नाटकातूनही शिळा मागवण्यात येतील. या सगळ्या शिळांचं परीक्षण दोन महिन्यांमध्ये करण्यात येईल. परीक्षणाच्या अहवालानुसार रामललाच्या मूर्तीच्या निर्मितीविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.

    नेपाळमधून शाळिग्राम बुधवारी अयोध्येमध्ये आणण्यात आले आहेत. दोन ट्रकमधून एनएच-27 वरून अयोध्या अंडरपासवर मंदिराच्या ट्रस्टचे महासचिव चंपत राय, सदस्य डॉ. अनिल मिश्र आणि महंत दीनेंद दास यांनी शिळांचं स्वागत करत त्या ताब्यात घेतल्या. नेपाळच्या गंडकी नदीतून या शिळा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही शिळांचं गुरुवारी कारसेवकपुरमजवळील राम सेवक पुरममध्ये पूजन केलं जाईल. त्यानंतर परीक्षण करण्यात येईल. पर्याय म्हणून मागवण्यात येणाऱ्या कर्नाटक आणि ओडिसामधील शिळा काळ्या रंगाच्या आहेत. मात्र इतर भागांमधल्या शिळांचा रंग थोडा वेगळा असू शकतो. शिळांचं परीक्षण करुन तज्ञ त्या शिळांपासून रामललाची मूर्ती तयार होणार की नाही हे सांगतील.

    नेपाळमधीन जनकपूर श्रीरामाचं सासर
    अयोध्येत जर भव्य राम मंदिर तयार होत असेल तर श्रीरामाचं सासर असलेल्या नेपाळमधील जनकपूरमधून काहीतरी योगदान स्वीकारलं गेलं पाहिजे, या विचाराने या शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. नेपाळमधील शिळांसोबत नेपाळच्या जनकपूरचे मेयर मनोज कुमार साह आणि नेपाळचे माजी गृह मंत्री विमलेंद्र निधि हेसुद्धा अयोध्येमध्ये आले आहेत. नेपाळचे माजी मंत्री विमलेंद्र निधी यांनी सांगितलं की, ज्या शिळा अयोध्येत आणल्या आहेत त्याचं परीक्षण आधीच पुरातत्व विभागाच्या लोकांनी केलं आहे. या चांगल्या प्रतीच्या शिळा आहेत. रामललासोबत सीतेची प्रतिमाही या शिळांपासून बनवण्यात यावी अशी नेपाळच्या लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. नेपाळ आणि अयोध्येचे संबंध चांगले राहावे यासाठी अयोध्या ते जनकपूर ट्रेन सेवेची मागणीही करण्यात आली आहे.