७ सप्टेंबरपासून मेट्रोसेवा सुरू होणार; ई-पासचे बंधन संपले

ई-पासचे (E-Pass)  बंधन संपले असून येत्या ७ सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा (Delhi Metro service) सुरू होणार आहे. त्यामुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती, तसेच माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात कुठेही मुक्तपणे संचार करता येणार आहे.

नवी दिल्ली: देशात अनलॉक-३ (unlock 3) चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असून केंद्र सरकारने  (Central Government) देशात अनल़ॉक-४  (unlock 4 ) ची नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-पासचे (E-Pass)  बंधन संपले असून येत्या ७ सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा (Delhi Metro service) सुरू होणार आहे. त्यामुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती, तसेच माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात कुठेही मुक्तपणे संचार करता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा ई-पास आणि ई-परमीटची आवश्यकता नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 २१ सप्टेंबरपासून सामाजिक,शैक्षणिक,मनोरंजन, खेळ, सांस्कृतिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रम १०० जणांच्या मर्यादेसह करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग अनिवार्य असणार आहे. तसेच ओपन थिएटर आणि ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळांना परवानगी देण्यात आली आहे.

नववी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या शाळांमध्ये जाऊ शकणार आहेत. परंतु ही सूट केवळ कंटेन्मेंट झोनमध्ये नसलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत कडक लॉकडाऊन सुरूच राहणार आहे.