दिल्ली पुन्हा हादरली, ॲमेझॉनच्या मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या; घटना CCTV मध्ये कैद

दिल्लीमध्ये ॲमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य दिल्लीतील भजनपुरा परिसरातील सुभाष विहार येथे ही घटना घडली.

    दिल्ली : दिल्लीमध्ये ॲमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य दिल्लीतील भजनपुरा परिसरातील सुभाष विहार येथे ही घटना घडली. ॲमेझॉनचा मॅनेजर त्याच्या मामासोबत दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी ५ जणांनी त्यांची दुचाकी रस्त्यात अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. डोक्यात गोळी लागल्याने अॅमेझॉनच्या मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मामा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरप्रीत सिंग (३६ वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या ॲमेझॉनच्या मॅनेजरचे नाव आहे.

    जखमीची प्रकृती चिंताजनक

    मंगळवारी हरप्रीत सिंग हा आपला मामा गोविंद यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांना टोळक्याने अडविले आणि दोघांवर गोळीबार केला. हरप्रीतच्या डोक्यामध्ये गोळी मारण्यात आली असून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मामा गोविंदा यांना देखील गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर पाचही हल्लेखोरांनी घटनास्थळारून पळ काढला. जखमी गोविंद यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुतेग बहादूर रुग्णालयात हलवण्यात आले.

    आरोपींचा शोध सुरू

    गोळीबाराची ही घटना घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू आहे.