काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना बुके देणं पोलिस महासंचालकांच्या अंगलट; निवडणूक आयोगानं थेट निलंबितच केलं

तेलंगणाचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार (Anjani Kumar) यांना निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपावरून निलंबित केले.

    हैदराबाद : तेलंगणाचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार (Anjani Kumar) यांना निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपावरून निलंबित केले. रविवारी सकाळी मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर असताना अंजनी कुमार (Anjani Kumar) काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी (Rewant Reddy) यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. मात्र, त्यांची ही कृती त्यांना चांगलीच महागात पडली.

    निवडणूक आयोगाने या प्रकारावर नाराजी व्यक्त करत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अंजनी कुमार यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने एक्स या सोशल मीडिया साईटवर दिले आहे.

    सूत्रानुसार, अंजनी कुमार यांनी राज्याचे पोलिस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल (खर्च) अधिकारी महेश भागवत यांच्यासह काँग्रेस उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही केले होते. निवडणूक आयोगाने या भेटीवर आक्षेप घेतला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.