मद्यधुंद अवस्थेत पोलीस उप महानिरीक्षकानचं काढली तरुणीची छेड, तरुणीनं IPS अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला जाळ, VIDEO व्हायरल, पुढं..

संपूर्ण पोलीस दलाची मान खाली झुकवावी लागेल, अशी लज्जास्पद घटना पणजीत समोर आलीय. गोव्यात एका आयपीएस अधिकाऱ्यानं दारुच्या नशेत महिलेशी गैरवर्तणूक केली. आयपीएस अधिकाऱ्याच्या या कृत्यानं संतापलेल्या या तरुणीनं या अधिकाऱ्याच्या कानाखाली जाळ काढला.

  पणजी : संपूर्ण पोलीस दलाची मान खाली झुकवावी लागेल, अशी लज्जास्पद घटना पणजीत समोर आलीय. गोव्यात एका आयपीएस अधिकाऱ्यानं दारुच्या नशेत महिलेशी गैरवर्तणूक केली. आयपीएस अधिकाऱ्याच्या या कृत्यानं संतापलेल्या या तरुणीनं या अधिकाऱ्याच्या कानाखाली जाळ काढला. या तरुणीनं या अधिकाऱ्याला यावेळी चांगलंच सुनावलंही. डॉ. ए कोआन असं या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. या तरुणीशी केलेल्या गैरवर्तणुकीचा आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. त्यानंतर या प्रकरणाचं राजकारणही रंगलं. यानंतर गोवा सरकारनं तातडीनं पावलं उचलत आयपीएस अधिकारी डॉ. ए कोआन यांना डीआयजी या पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतलाय.

  नेमका काय घडलाय प्रकार ? 

  तरुणीशी छेडछाडीची ही घटना कलंगुटमधील एका पबमध्ये झाल्याचं सांगण्यात येतंय. आयपीएस अधिकारी असलेले डॉ. कोआन दिल्ली पोलीस दलात डीसीपी पदावर तकार्यरत होते. एजीएमयूटी कॅडेरचे ते आयपीएस आहेत. ही तरुणी दिल्लीची रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. ही तरुणी गोव्यात पर्यटनासाठी आलेली असताना हा प्रकार घडलाय.

  काय आहे व्हिडीओत ? 

  व्हिडीओत डीआयजींसोबत एक महिला वाद घालताना दिसतेय. पबमध्ये डीआयजींच्या दिशेनं जात असलेल्या या तरुणीला बाऊन्सर्स रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. ही तरुणी आयपीएस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारते आणि त्याच्यावर ओरडत असल्याचं दिसतंय. या आयपीएस अधिकाऱ्यानं गैरवर्तणूक केल्यानंतर संपातलेल्या या तरुणीनं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येतंय.

  सगळं माध्यमांसमोर कसं आलं ? 

  पबमध्ये हे प्रकरण झाल्यानंतर त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. हा पब ज्या व्यक्तीच्या मालकीचा आहे, त्याचे राजकीय संबंध असल्याचं सांगण्यात येतंय. प्रकरण आयपीएस अधिकाऱ्याशी संबंधित असल्यानं, या महिलेवर दबाव टाकण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं या प्रकरणात कोणतीही तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आलेली नाही. आता हा व्हिडीओ व्हारल झाल्यानं याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली, त्यानंतर या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

  14 ऑगस्टपर्यंत अधिकारी होता सुट्टीवर 

  ए कोआन हे 14 ऑगस्टपर्यंत सुट्टीवर असल्याचं सांगण्यात येतंय. ते वास्कोत राहतात. वास्कोपासून 40 किमी अंतरावर असलेलल्या या पबमध्ये ते आले होते. त्या ठिकाणी त्यांनी दारु प्यायली, या व्हिडीओ क्लीपमध्ये मद्यधुंद अवस्थेत या अधिकाऱ्याला बाहेर घेऊन जात असताना बाऊन्सर्स दिसत आहेत.

  अमित शाहा यांच्यापर्यंत गेलं प्रकरण

  सीसीटीव्हीत हे आयपीएस अधिकारी चालू शकत नव्हते इतके नशेत असल्याचं समोर आलंय. या अधिकाऱ्याच्या या कृतीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला कळवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय. आयपीएस अधिकारी असल्यानं त्यांच्यावर कारवाईचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येईल असंही सांगण्यात येतंय.