गुळगुळीत रस्त्यावर म्हशीने टाकले शेण; मालकाला ठोठावला १०,००० रुपयांचा दंड

ग्वाल्हेर. देशात गुळगुळीत रस्ते बांधकामाला वेग आला असून मार्गही प्रशस्त केले जात आहेत.  अनिर्बांध वाहतूक व्हावी या यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  आता हेच गुळगुळीत रस्ते खराब न व्हावे म्हणून प्रशासनातर्फे काळजी घेतली जात असून प्रसंगी कारवाईही करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.  अशाच एका गुळगुळीत रस्त्यावर घाण करणाऱ्या एका म्हशीच्या मालकाला १०००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा प्रकार घडलाय मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये.  नव्याने बांधलेल्या रस्त्यावर मालकाच्या म्हशीने शेण  होते त्यामुळे प्रशासनाने हा दंड ठोठावला.

आयुक्तांना खटकली बाब
प्राप्त माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील सिरोळ भागात डीबी सिटी रोड पुन्हा तयार करण्यात येत आहे. यावेळी, पालिकेचे आयुक्त कामाचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहोचले असता त्यांना रस्तयावरून जाणाऱ्या म्हशींनी शेण टाकले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  ही बाब त्यांना खटकली आणि त्यांनी तत्काळ म्हशीच्या मालकाला दंड ठोठावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

नूतनीकरणाचे काम सुरू
ग्वाल्हेरच्या डीबी सिटी रोडच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे पालिकेचे विभागीय अधिकारी मनीष कन्नौजिया यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त संदीप मकीन हे रस्ते बांधकामाची तपासणी करण्यासाठी आले असता तेथून जाणाऱ्या म्हशींनी रस्त्यावर शेण टाकले असल्याचे त्यांना आढळून आले. यानंतर आयुक्त संदीप यांनी तातडीने म्हैस मालकाला दंड आकारण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठीच कारवाई
नूतनीकरण करण्यात येत असलेल्या रस्त्यावर शेण टाकणाऱ्या म्हशीच्या मालकाचे नाव बेतालसिंग असे आहे.  आयुक्तांनी घेतलेल्या बेधडक निर्णयानंतर प्रशासनात त्यांचाही दरारा वाढला असून  आता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांनाही दंडित केले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.