कॅनडाच्या नागरिकांसाठी पुन्हा ई-व्हिसा सेवा सुरू; दोन महिन्यांच्या स्थगितीनंतर निर्णय

सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशनल कारणे' सांगून कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. आता भारताने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे.

    नवी दिल्ली : भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी दोन महिन्यांच्या स्थगितीनंतर ई-व्हिसा सेवा (E-Visa) पुन्हा सुरू केली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशनल कारणे’ सांगून कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. आता भारताने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे.

    दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानच्या मुद्यावर वादग्रस्त चर्चेनंतर द्विपक्षीय मतभेद वाढले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची जूनमध्ये कॅनडातील व्हॅकुव्हर येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

    हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटाचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी होता. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान संबंध ताणले होते. या पार्श्वभूमीवर 21 सप्टेंबर रोजी भारताने व्हिसा सेवा स्थगित केली होती. पण आता दोन महिन्यांच्या स्थगितीनंतर सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.