चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आज; निकालात दडलाय लोकसभेचा कौल, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पाच राज्यांमध्ये मतदानानंतर आता मिझोराम वगळता राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांचे निकाल आज (दि.3) जाहीर केले जाणार आहेत. दुपारी दोननंतरच या राज्यांतील जनतेचा कल कोणाला आहे हे स्पष्ट होईलच

  नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये मतदानानंतर आता मिझोराम वगळता राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांचे निकाल (Election Results 2023) आज (दि.3) जाहीर केले जाणार आहेत. दुपारी दोननंतरच या राज्यांतील जनतेचा कल कोणाला आहे हे स्पष्ट होईलच शिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल कोणत्या पक्षाला असेल याचेसुद्धा संकेत मिळणार आहेत.

  या निवडणुकांकडे 2024 च्या लोकसभेची सेमीफायनल म्हणूनच पाहिले जात आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजपासह अन्य पक्षांची धाकधूक वाढली आहे.

  दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  या निकालांसह अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठाही पणाला लागल्या आहेत. यात भाजपकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर काँग्रेसतर्फे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधींचाही समावेश आहे. या नेत्यांनी निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकद झोकली होती. जय-पराजयाच्या आधारावरच या नेत्यांची लोकप्रियता निश्चित ठरेल.

  राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सचिन पायलट, भाजपच्या वसुंधरा राजे आणि गजेंद्र सिंह शेखावत.

  मध्यप्रदेश : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेसचे कमलनाथ, दिग्विजय सिंह. तेलंगणा: मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव, काँग्रेसचे रेवंत रेड्डी, केंद्रीय मंत्री जी. किशन रेडी. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार.

  छत्तीसगड : मुख्यमंत्री भूपेश बघेल, टी. एस. सिंहदेव, भाजपा खासदार विजय बघेल, माजी मुख्यमंत्री रमणसिंह.

  राजभवनाकडे रिमोट !

  निकालानंतर उद्‌भवलेल्या राजकीय परिस्थितीत राजस्थान आणि मध्यप्रदेशातील सत्ता निकषाचा रिमोट राजभवनाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एक्झिट पोलही या दोन राज्यांच्या संभाव्य अंदाजाबाबत चक्रावले असल्याचे दिसून आले होते. अशा स्थितीत कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यास राजभवन सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाला निमंत्रण द्यायचे याचा निर्णय राजभवनला घ्यावा लागणार आहे.