इलेक्टोरल बाँडची हैदराबादमध्ये झाली सर्वाधिक विक्री; निवडणूक काळात विकले एक हजार कोटींचे बाँड

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 1006.03 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या निवडणूक रोख्यांची विक्री झाली आहे. 2018 च्या तुलनेत निवडणूक रोख्यांच्या विक्रीत तब्बल 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 1006.03 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या निवडणूक रोख्यांची विक्री झाली आहे. 2018 च्या तुलनेत निवडणूक रोख्यांच्या (Electoral Bond) विक्रीत तब्बल 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) सर्वाधिक राजकीय निधी हैदराबादमध्ये जमा झाला.

    स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून आरटीआय दाखल करून मिळालेल्या आकडेवारीत हे उघडकीस झाले आहे. एसबीआय डेटानुसार, 2018 मध्ये 1 ते 11 नोव्हेंबर या काळात निवडणूक रोख्यांच्या सहाव्या टप्याची विक्री 184.20 कोटी रुपये झाली होती. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या पाच राज्यांत निवडणुका झाल्या. इलेक्टोरल बाँड योजनेअंतर्गत (29 व्या टप्प्यात) तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 359 कोटी रुपये सर्वाधिक विक्री झाली. त्यापाठोपाठ मुंबई 259.30 कोटी आणि दिल्लीत 182.75 कोटी रूपयांच्या रोख्यांची विक्री झाली आहे.

    इतर राज्यांमध्ये जेथे निवडणुका झाल्या, तेथे जयपूर (राजस्थान) येथे 31.50 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे, रायपूर (छत्तीसगड) येथे 5.75 कोटी आणि भोपाळमध्ये 1 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकले गेले. तर, मिझोरममध्ये विक्रीची नोंद झाली.