soldiers

जम्मू काश्मीर पोलिसांनी(jammu kashmir police) शनिवारी शोपियन येथील फेक एन्काउंटर(fake encounter) प्रकरणी भारतीय लष्करातील एका कॅप्टनसह तिघांविरूद्ध न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले. तीन मजुरांच्या बनावट चकमकीप्रकरणी शोपियनच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी(jammu kashmir police) शनिवारी शोपियन येथील फेक एन्काउंटर(fake encounter) प्रकरणी भारतीय लष्करातील एका कॅप्टनसह तिघांविरूद्ध न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले. तीन मजुरांच्या बनावट चकमकीप्रकरणी शोपियनच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने १८ जुलै २०२० रोजी शोपियनच्या अशिमपुरा येथे झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार मारण्याचा दावा केला होता. या प्रकरणानंतर चौकशीसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. त्यानंतर या पथकाने पीडितांच्या कुटुंबाची भेट घेत चकमक झालेल्या ठिकाणीची पाहणी केली. तपासादरम्यान ४९ साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात आला होता.

शोपियन न्यायालयाने ६२ राष्ट्रीय रायफल तुकडीचे कॅप्टन भूपिंदर यांच्याविरुद्ध फौजदारी न्यायालयाच्या कायद्याआधारे खटला चालवला जावू शकतो का? अशी विचारणा लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. १८ जुलै रोजी शोपियनच्या अशिमपुरा येथे बनावट चकमकीत तीन मजुरांना अतिरेकी समजून ठार करण्यात आले होते. चकमकीनंतर कॅप्टन भूपिंदर आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी त्या मजुरांच्या मृतदेहाजवळ शस्त्रे ठेवली व ते दहशतवादी असल्याचे भासवले होते. तसेच अधिकाऱ्यांना देखील यासंदर्भात खोटी माहिती पुरवली, असे एआयटीच्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

दरम्यान त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील मजुरांच्या कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली. मारले गेलेले मजूर हे कामानिमित्त शोपियन येथे गेले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. कुटुंबियांनीही या प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली. त्यानंतर लष्कराने या कथित चकमकीची चौकशी सुरू केली होती. १८ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने चकमकीदरम्यान सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा १९९०चं उल्लंघन झाल्याचं मान्य करत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. लष्कराच्या कोर्ट ऑफ इनक्वायरीत जवान दोषी असल्याचं आढळून आले. त्यानंतर लष्कराने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.

दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी मृतांच्या डीएनएची चाचणी केली होती. तिघांचे डीएनए हे राजौरी येथील त्यांच्या कुटुंबीयांशी जुळणारे होते. त्यानंतर लष्कराने ठार करण्यात आलेले हे तिघे अतिरेकी नसून, कामासाठी अमशिपुरा येथे कामासाठी आले होते, असं समोर आलं. अबरार अहमद , इम्तियाज अहमद आणि मोहम्मद इब्रार अशी या मजुरांची नावे होती.  ३ ऑक्टोबर रोजी त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले होते.