चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल तयार केल्याचा दावा करणाऱ्या इस्रोच्या बनावट वैज्ञानिकाला अटक!

अटक करण्यात आलेला आरोपी मितुल त्रिवेदी स्वतःला इस्रोचा वैज्ञानिक सांगत होता. स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दावा केला होता की, चांद्रयान-3 मोहिमेसाठी त्यांनी लँडर मॉड्यूल डिझाइन केले होते.

  चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशाने संपूर्ण देश आनंदात आहे. इस्रोने ( ISRO ) सुरू केलेल्या या मोहिमेबद्दल नवनवीन अपडेटही समोर येत आहे. परंतु प्रत्येकजण इस्रोच्या प्रशासनाला किंवा त्याच्या वैज्ञानिकांना ओळखत नाही. याचा फायदा घेत अनेक नटवरलाल वाहवा गोळा करण्यात व्यस्त आहेत. गुजरात पोलिसांनी चांद्रयान-3 प्रक्षेपणात इस्रोशी संबंधित एका बनावट शास्त्रज्ञाला अटक (Fake scientis) केली आहे. अटक करण्यात आलेला हा व्यक्ति स्वतःला इस्रोचा वैज्ञानिक सांगत होता. स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दावा केला होता की, चांद्रयान-3 मोहिमेसाठी त्यांनी लँडर मॉड्यूल डिझाइन केले होते.

  नेमका प्रकार काय?

  चांद्रयान-3 मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर स्थानिक मीडियामध्ये मितुल त्रिवेदीची मुलाखत पाहून गुजरातमधील सूरत शहरातील कोणीतरी पोलिसात तक्रार केली.  आरोपी मितुल त्रिवेदी याने मीडियाला मुलाखत देताना सांगितले की, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल त्याने डिझाइन केले आहे.

  आरोपीकडून बनावट नियुक्ती जप्त

  एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २३ ऑगस्ट रोजी विक्रम लँडरच्या यशस्वी सॉफ्ट-लँडिंगनंतर त्याची मुलाखत घेताना दिसल्यानंतर आरोपी मितुल त्रिवेदीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलची रचना त्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी सांगितले की, मितुल त्रिवेदी याने स्वतःची ओळख इस्रोच्या प्राचीन विज्ञान अनुप्रयोग विभागाचे सहाय्यक अध्यक्ष म्हणून दिली. त्याच्याकडून 26 फेब्रुवारी 2022 चे बनावट नियुक्ती पत्र देखील जप्त करण्यात आले, जे त्याने पुरावा म्हणून सादर केले. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की आरोपी मितुल त्रिवेदी हा इस्रोशी कोणत्याही प्रकारे जोडलेला नाही. तिथे त्याने कधीच काम केलं नाही.

  पोलिसांनी दाखल केला गुन्हा

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात योगदान देत नसतानाही मितुल त्रिवेदीने इस्रोबद्दल खोटे संदेश पसरवले. त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला तडा गेला. सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४१९, ४६५, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.