शेतकरी पुन्हा आक्रमक; शेतकऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी देशभर ट्रॅक्टर मोर्चा; संयुक्त किसान मोर्चाची माहिती

प्रजासत्ताकदिनी देशातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची कर्नाल (हरियाणा) येथील गुरुद्वारा डेरा कार सेवा येथे ही बैठक पार पडली.

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी मागील वर्षी आक्रमक (Farmers Aggressive) झाले होते. त्यानंतर दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन (Delhi Agitation) करण्यात आले. वर्षभर चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर पंजाब निवडणुकीच्या (Punjab Election) तोंडावर हे कायदे मागे घेतले. मात्र, आता काही मागण्यांसाठी पुन्हा शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  प्रजासत्ताकदिनी (Republic Day) देशातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा (Tractor March) काढण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची कर्नाल (हरियाणा) येथील गुरुद्वारा डेरा कार सेवा येथे ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक हन्नान मौला यांनी याबाबत माहिती दिली.

  हन्नान मौला म्हणाले, प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावरील सरकारी कार्यक्रम पार पडल्यानंतर देशभरात जिल्हास्तरावर ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. याच दिवशी हरियाणातील जिंद येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात येईल. या महापंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीत करावयाच्या आंदोलनाची तारीख आणि रुपरेषा निश्चित करण्यात येणार आहे.

  मागण्या काय?

  • शेतमाल हमीभाव कायदा करा
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा
  • शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्या
  • शेतीयोग्य जमिनीचे भूसंपादन करू नका
  • लखीमपूर खेरी हत्याकांडप्रकरणी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या
  • नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या