झारखंडमधे इमारतीला लागली आग; 15 जणांचा होरपळुन मृत्यू,18 जखमी

शहरातील बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शक्ती मंदिराजवळील आशीर्वाद टॉवरला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली.

    झारखंडमधे एक मोठी दुर्घटना घडली आहे. धनबाद येथील आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागल्याची घटना (Dhanbad Fire) उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत एकूण 15 जणांचा होरपळुन मृत्यू झाला आहे. तर, 18 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 11 महिला, तीन मुले आणि एका पुरुषांचा समावेश आहे

    शहरातील बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शक्ती मंदिराजवळील आशीर्वाद टॉवरला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.   बघता बघता या आगीने हळूहळू भयानक रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या सर्व प्रयत्नांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या 15 आहे. या आशीर्वाद टॉवरमध्ये किती लोक अडकले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. इमारतीला लागलेली आग दुरून दिसत होती. 

    पूजा सुरू असताना उडाली ठिणगी

    धनबादचे उपायुक्त संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये  पूजा सुरू असताना आगीची ठिणगी पडली. मात्र बघता बघता ही आग वाढली. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बचावकार्य सुरू आहे.

    दोन दिवसांपूर्वी क्लिनिकला  लागली होती आग 

    दोन दिवसांपूर्वी शहरातील बँक मोड पोलीस स्टेशन हद्दीतील हाजरा क्लिनिकमध्ये आग लागली होती. या घटनेत गुदमरून ५ जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. 

    १९ दुकाने जळून खाक 

    धनबादच्या कुमारधुबी मार्केटमध्ये सोमवारी सकाळी भीषण आग लागली. काही वेळातच ही आग एकामागून एक अनेक दुकानांमध्ये पसरली. या आगीमुळे 19 दुकाने जळून खाक झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे. दुकानदारांनी स्वतःहून आग विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोकांच्या दुकानांना आग लागल्याचे समजताच सर्व प्रथम दुकानदारांनी स्वतः ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण होती की ती विझण्याऐवजी अधिकच पसरली.