फिरोजाबादमध्ये तळघरातील फर्निचर शोरूमला आग; घरातील ६ जणांचा मृत्यू

फिरोजाबादमधील पाढम भागात काल संध्याकाळी भीषण आग लागली. तळघरातील फर्निचर शोरूमला सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली आणि ती तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घरापर्यंत पोहोचली. आगीत संपूर्ण कुटुंब अडकले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तासांहून अधिक वेळ लागला. या आगीत व्यापारी कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.

    लखनौ – फिरोजाबादमधील (Firozabad) पाढम भागात काल संध्याकाळी भीषण आग लागली. तळघरातील फर्निचर शोरूमला (Furniture Showroom) सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली आणि ती तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घरापर्यंत पोहोचली. आगीत संपूर्ण कुटुंब अडकले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला (Fire Brigade) तीन तासांहून अधिक वेळ लागला. या आगीत व्यापारी कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले.

    मनोजकुमार रमणप्रकाश (३५), पत्नी नीरज मनोज कुमार (३५), मुलगा हर्ष मनोज कुमार (१२), मुलगा भारत मनोज (८), शिवानी नितीन (३२), तेजस्वी नितीन (३ महिने) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi Adityanath) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. घरात इन्व्हर्टर बनवण्याचे काम व्हायचे. शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) आग लागली.

    पाढम भागातील मुख्य बाजारपेठेत रमण राजपूत यांचे तीन मजली घर आहे. तळमजल्यावर फर्निचर आणि वरील मजल्यावर इलेक्ट्रॉनिक्स दुकान होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांचे कुटुंब राहते. तळघरातील फर्निचर शोरूमला मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. फर्निचरला लागलेली आग वेगाने पसरत वरच्या भागापर्यंत पोहोचली. आग लागल्याचे समजताच व्यापारी रमण राजपूत आणि त्यांचा लहान मुलगा नितीन घरातून बाहेर आले; मात्र कुटुंबातील इतर सदस्य बाहेर पडू शकले नाहीत.