चेन्नईत मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू, कार पाण्यात वाहुन गेल्या; विमानतळावर भरलं पाणी!

मिचौंग चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात धडकू शक्यता आहे. चेन्नईत अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

  गेल्या 2-3 दिवसापासून दक्षिण भारतात मिचौंग चक्रीवादळानं कहर केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं चक्रीवादळाचं रुप धारणं केलं आहे. आज हे चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशातील बापटला जवळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकू शक्यता आहे. यामुळे गेल्या काही तासांत आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. चेन्नईत अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुराचे पाणी सरकारी रुग्णालयांमध्ये घुसल्याने आरोग्य सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. तर मेट्रो स्थानकांवर आणि विमानतळावरही पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून इंटरनेट सेवाही खंडित झाली आहे.

  चेन्नई विमानतळावर भरलं पाणी

  चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचले होते, त्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती. अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर, दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग 7 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. मंगळवारी पहाटे 2:30 वाजता, ते नेल्लोरच्या 20 किमी उत्तर-ईशान्येस, चेन्नईच्या 170 किमी उत्तरेस, बापटलापासून 150 किमी दक्षिणेस आणि मछलीपट्टनमच्या 210 किमी दक्षिण-नैऋत्येस मध्यभागी होते. मिचॉन्ग एक तीव्र चक्री वादळ म्हणून नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान बापटला जवळ दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

  चेन्नईतही मंगळवारी सुट्टी आहे

  तामिळनाडू सरकारने चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. तामिळनाडूमध्ये सोमवारी रात्रीपर्यंत पावसाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत चेन्नईमधील पेरुंगुडी येथे 29 सेमी पाऊस झाला, तर तिरुवल्लूर जिल्ह्यातील अवाडी येथे 28 सेमी आणि चेंगलपेटमधील ममल्लापुरम येथे 22 सेमी पावसाची नोंद झाली.

  हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने भाविकांना श्री कपिलतीर्थम धबधब्यात स्नान करण्यापासून रोखले आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा बाबू (जेथे मछलीपट्टणम आहे) म्हणाले की, जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. 57 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. सखल भागातून लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. मदत शिबिरात येणाऱ्या लोकांना मदत केली जात आहे. एकट्या येणाऱ्या लोकांना 1000 रुपये आणि कुटुंबासाठी 2000 रुपये दिले जात आहेत.