आसाममध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

    आसाममध्ये (Assam) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग (Chirang) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. दरम्यान, एसडीआरएफच्या (SDRF) पथकांनी १०० हून अधिक जणांची सुखरुप सुटका केली आहे.

    आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sharma) यांच्याशी बोलून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे. खुद्द मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी ही माहिती दिली आहे.

    राज्यातील २८ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या जिल्ह्यांतील दोन हजार ९३० गावांतील १९ लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह नऊ जणांना जीव गमवावा लागला. या पुरामुळे आतापर्यंत ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने घरे पाण्याखाली जात आहेत. तसेच, जवळपास ६४ रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ४३ हजार ३३८ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, जिया भराली, कोपिली येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे.