भारताचे माजी क्रिकेटपटू, उत्तरप्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचं निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे आज निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचीही लागण झाली होती. गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.  दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल असल्याची माहिती चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी दिली.

चेतन चौहान हे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते . तसेच ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले. क्रिकेटपटू असलेले चेतन चौहान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात उत्तुंग शिखरावर होते. त्यांची  आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती.गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.  १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले. १९८१ साली चौहान यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.