गुलाम नबी आझादांचा नवा पक्ष; नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर नाव जाहीर

जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाचे नाव जाहीर केले. पक्षाची घोषणा यापूर्वीच करायची होती. मात्र, नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर याची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी नव्या पक्षाची (New Political Party) घोषणा केली आहे. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला (Congress) रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी नव्या पक्षासह नावाची घोषणा केली आहे.

    ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ (Democratic Azad Party) असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले. पक्षाची घोषणा यापूर्वीच करायची होती. मात्र, नवरात्रीच्या (Navaratri) शुभमूहूर्तावर याची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.

    आझाद म्हणाले की, पक्षाची विचारधारा नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील असे स्पष्ट केले. आझाद यांनी यापूर्वीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला असून, यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्द्यांचा समावेस आहे. मार्च २०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.