
देशात सध्या अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना सुरू आहेत, ज्याचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येकी २ हजार रुपयांनी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र, आता या हफ्त्यात आणखी वाढ केली जाणार असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6 हजार रूपयांवरून 8 हजार रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटी 5 मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
CNBC-TV18 च्या अहवालानुसार, केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत 10,000 कोटी रुपयांची बचत केली आहे. योजनेतून अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकल्यामुळे ही बचत झाली आहे.
सुमारे 1.72 कोटी अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती अहवालात आहे. त्यामुळे ही बचत करणे शक्य झाले आहे. ही मोठी बचत पाहता सरकार पीएम-किसानचा निधी वाढवू शकते, अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली आहे.
15 वा हप्ता लवकरच मिळणार
पीएम-किसान योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिला जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे.