इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भव्य प्रतिमा, अमर जवान ज्योती वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, २३ जानेवारीला होणार मूर्तीचे अनावरण

    नवी दिल्ली : अमर जवान ज्योतीच्या (Amar Jawan Jyoti) वृत्तानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. इंडिया गेटवर (India Gate) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भव्य मूर्ती (Magnificent Statue of Netaji Subhash Chandra Bose) स्थापित करण्यात येणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी ट्विट (Tweet) करत ही माहिती दिली.

    ‘या वेळी संपूर्ण देश नेताजीसुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करीत आहे. या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ग्रेनाईटने तयार केलेली भव्य मूर्ती इंडिया गेटवर स्थापन करण्यात येणार आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. त्यांच्या प्रती असलेल्या देशाच्या ऋणाचे ही मूर्ती प्रतीक ठरेल. जोपर्यंत नेताजींची भव्य मूर्ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांची होलोग्रामची एक प्रतिमा त्या ठिकाणी असेल. २३ जानेवारीला मी या प्रतिमेचे अनावरण करणार आहे’ असे ट्विट मोदींनी केले आहे.

    कुठे होणार मूर्तीची स्थापना

    इंडिया गेटवर गेलेया ६ दशकांपासून रिकाम्या असलेल्या एका छत्रीत नेताजींची ही भव्य मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. यापूर्वी त्या छत्रीत किंग जॉर्ज पाचवे यांची प्रतिमा होती, जी १९६८ साली हटविण्यात आली होती.

    अमर जवान ज्योती आता नॅशनल वॉर मेमोरियलच्या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आली आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही अमर जवान ज्योती इंडिया गेटची ओळख होती. शुक्रवारी दुपारी ही ज्योत एका समारंभात वॉर मेमोरियल ज्योतीत मिसळण्यात आली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एयर मार्शल बलभद्र राधाकृष्ण होते.

    यापूर्वी सरकारने एक मोठा निर्णय घेत, प्रजासत्ताक समारोह २४ जानेवारीऐवजी २३ जानेवारीपासून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात समाविष्ट व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

    गेल्या वर्षीपासून २३ जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. देशातील युवकांना नेताजींच्या कार्याचे स्मरण आणि प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेताजींना मानवंदना देण्याचाही उद्देश यामागे आहे.