ias officer grandparents suicide

गोपी येथील रहिवासी असलेले जगदीश चंद्र आणि भागली देवी हे त्यांचा मुलगा वीरेंद्र यांच्याजवळ बाढडा येथे राहत होते. वीरेंद्र आर्य यांचा मुलगा विवेक आर्य 2021 मध्ये आयएएस झाला. त्याला हरियाणा कॅडर मिळाली आहे. जगदीश चंद्र आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या बढडा येथील राहत्या घरी विषारी पदार्थ खाल्ला. यानंतर रात्री उशिरा साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास जगदीश चंद्र यांनी विष खाल्ल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली.

हरियाणातील (Haryana) चरखी दादरी येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्याच्या आजी-आजोबांनी कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide Note) केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याविषयी सांगितलं की, या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटही लिहून ठेवली होती, जी त्यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिली. ‘माझ्या मुलांकडे 30 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण आम्हाला द्यायला भाकरीचा तुकडाही नाही,’ असं या नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी संबंधित कुटुंबातील मुलगा, दोन सूना आणि पुतण्या या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपी येथील रहिवासी असलेले जगदीश चंद्र आणि भागली देवी हे त्यांचा मुलगा वीरेंद्र यांच्याजवळ बाढडा येथे राहत होते. वीरेंद्र आर्य यांचा मुलगा विवेक आर्य 2021 मध्ये आयएएस झाला. त्याला हरियाणा कॅडर मिळाली आहे. जगदीश चंद्र आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या बढडा येथील राहत्या घरी विषारी पदार्थ खाल्ला. यानंतर रात्री उशिरा साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास जगदीश चंद्र यांनी विष खाल्ल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली. यानंतर ईआरवी 151 घटनास्थळी दाखल झाले आणि बढडा पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

जगदीशचंद्र यांनी मृत्यूपूर्वी सुसाइड नोट पोलिसांना दिली. प्रकृती बिघडल्याने वृद्ध दाम्पत्याला प्रथम बढडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. मात्र येथे दादरी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयात पोहोचून पोस्टमॉर्टमसंदर्भात कागदोपत्री कारवाई केली. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे.

सुसाइड नोटमध्ये काय?
सुसाइड नोटमध्ये जगदीश चंद्र यांनी म्हटले आहे, “मी जगदीश चंद्र आर्य तुम्हाला माझी व्यथा सांगतो. माझ्या मुलांची बढड्यात 30 कोटींची संपत्ती आहे, पण मला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन भाकऱ्याही नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. पण 6 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. काही दिवस त्याच्या पत्नीने भाकरी दिली, पण नंतर तिने चुकीचे काम करायला सुरुवात केली. तिने माझ्या पुतण्याला सोबत घेतलं. मी विरोध केला, हे त्यांना आवडले नाही. कारण मी असताना ते दोघेही चुकीची कामे करू शकत नव्हते. यामुळे त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर काढलं. मी दोन वर्ष आश्रमात राहिलो आणि परत आलो, तर त्यांनी घराला कुलूप लावले. या काळात माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला आणि आम्ही आमच्या दुसऱ्या मुलासोबत राहू लागलो.

आता त्यांनीही आम्हाला ठेवण्यास नकार दिला आणि शिळ्या भाकरी आणि शिळे व खराब दही द्यायला सुरुवात केली. हे विष किती दिवस खाणार म्हणून मी सल्फसची गोळी खाल्ली. माझ्या मृत्यूचे कारण माझ्या दोन सूना, एक मुलगा आणि एक पुतण्या आहेत. या चौघांनी माझ्यावर जेवढे अत्याचार केले तेवढे अत्याचार कोणत्याही मुलाने आपल्या आई-वडिलांवर करू नयेत. सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. बँकेत माझ्या दोन एफडी आणि बढडा येथे दुकान आहे, ते आर्य समाज बढडा यांना देण्यात यावे.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी बढडा पोलीस ठाण्यातील एएसआय आणि तपास अधिकारी पवन यांनी सांगितले की, पोलिसांनी गुरुवारी रुग्णालयात जावून पोस्टमॉर्टमसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची कारवाई केली. यानंतर, वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. तसेच सुसाइड नोटच्या आधारे कुटुंबातील चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.