संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गेल्या काही दिवसांत देशातील 18 राज्यांमध्ये अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. आता मान्सून परतीच्या मार्गावर आहे. यंदा मान्सून आठ दिवसांच्या विलंबाने माघारी जात आहे.

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत देशातील 18 राज्यांमध्ये अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. आता मान्सून परतीच्या मार्गावर आहे. यंदा मान्सून आठ दिवसांच्या विलंबाने माघारी जात आहे. हवामान विभागानुसार, 17 सप्टेंबरपासूनच भारतात मान्सून माघारी जायला हवा होता. परंतु, सर्वसाधारण तारखेच्या आठ दिवसांनी सोमवारपासून मान्सूनला परतीचे वेध लागले आहे.

    आयएमडीनुसार, राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम राजस्थानमधून परतण्याची सामान्य तारीख 17 सप्टेंबर होती. यंदा मान्सूनच्या परतीच्या मार्गाला विलंब झाल्यामुळे पाऊस लांबला आहे. साधारणतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये 1 जूनला येतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो.

    महाराष्ट्रासह बिहार, झारखंडला पावसाने झोडपले

    महाराष्ट्रासह बिहार, झारखंड यांसारख्या राज्यात पावसाने झोडपून काढले असून, मान्सून चांगला सक्रिय झाला आहे. परतीच्या पावसाने दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांना झोडपले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश यासह देशातील 18 राज्य मुसळधार पाऊस पडत आहे.

    गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी

    काश्मीरच्या वरच्या भागात बर्फवृष्टी तर मैदानी भागात पाऊस झाल्यामुळे खोऱ्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अधिकाऱ्यांनुसार, उत्तर काश्मीरमधील अमरनाथ गुहा मंदिर आणि गुलमर्ग सह दक्षिण काश्मीरच्या वरच्या भागात बर्फवृष्टी झाली आहे. खोऱ्यातील बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, श्रीनगर शहरात सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 18.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली.